ठाणे -नाशिक मार्गे मुंबई येथे हवालाचे पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कार मालकाला नाशिक मुंबई महामार्गावरील हायवेदिवे येथील पेट्रोल पंपा समोर तिघा अज्ञातांनी अडवले. त्यानंतर कारमधील 45 लाख रुपयांची रोकड असलेली एक बॅग घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत तीन पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांना अटक केली ( Arrested Three Pune Policemen for Robbery )आहे. गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने, असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर बाबूभाई राजाराम सोळंकी, असे त्यांच्या चौथ्या साथीदाराचे नाव आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा आला उघडकीस -औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे ८ मार्च रोजी आपल्या कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील पाच कोटी रुपयांची रोकड विविध बॅगांमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. त्याच दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावरील हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन व्यक्तींनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी 10 मार्चला रात्री उशिरा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले. त्यानंतर बाबूभाईकडे कसून चौकशी केली असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याकडे केलेल्या चौकशीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने यांचा लुटमारीत सहभाग असल्याचे उघडकीस आले. घटनेची दिवशी या तिघा पोलिसांनी कार चालकास थांबवून 45 लाखांची रोकड पळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या तिन्ही फरार असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातच शनिवारी (दि. 12 मार्च) ताब्यात घेऊन अटक केली आहे.