ठाणे- ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडी पोलीस ( Kapurbawdi police ) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रॉडवे पेट्रोल पंपावर 31 जानेवारीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे साडे 27 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे यातील एकजण या पंपावर ( Petrol Pump ) काम करत होता.
झटपट पैसे कमविण्याच्या नादात एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. नयन पवार, असे त्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तर निलेश मांडवकर हा त्याचा साथीदार याच पंपावरील माजी कर्मचारी होता. या दोघांची मैत्री सुधाकर मोहिते आणि भास्कर सावंत यांच्याशी होती जे अट्टल गुन्हेगार होते. दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे दाखल असून या पेट्रोल पंपावरील जमा होणाऱ्या पैशाबद्दल ऐकून सर्वांनी या ठिकाणी लूट करण्याचा निर्णय घेतला. 31 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांनी या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकत एकूण साडे सत्तावीस लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. पोलिसांनी ( Thane Police ) चौघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.