ठाणे - रस्ते, इमारतींच्याकडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालकांनी नवीन शक्कल लढवली आहे. अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर हे चालक स्वत:जवळील ‘जॅमर’ चाकांना लावतात. गाडीला ‘जॅमर’ लागल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहनावर कारवाई झाल्याचा समज होतो. त्यामुळे ते कारवाई करत नाहीत. अशा प्रकारच्या ‘जॅमर’द्वारे ठाणेकर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.
वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अनोखी युक्ती
ठाणे महानगरपालिका हद्दीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही. नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालक वाहनाला खासगी जॅमर लावतात.
हेही वाचा - दादांच्या बंडानंतर सुप्रिया ताईंचे वाढले महत्व
लाल-पिवळ्या रंगाचे हे जॅमर वाहतूक शाखेकडे असलेल्या जॅमरप्रमाणे आहेत. या जॅमरची विक्री सुमारे दीड हजार रुपयांना होत आहे. लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट परिसरातील अनेक भागात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना असे दिशाभूल करणारे जॅमर लावण्यात येत आहेत.
माजीवडा येथील फ्लॉवर व्हॅली आणि वंदना सिनेमा गृहाजवळ असे जॅमर लावून मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात आहेत. यातील अनेक वाहने विक्रीसाठी ठेवलेली असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.
वाहतूक विभागाच्या जॅमरवर आम्ही विशिष्ट सांकेतिक क्रमांक नमूद केलेला आहे. हे जॅमर लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या जॅमरशी साधर्म्य असलेले जॅमर वाहनांच्या चाकाला लावण्याचे प्रकार वाहनचालकांकडून होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येत आहे.