ठाणे -यंदाच्या गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. असे असताना देखील भक्त फिजिकल डिस्टन्सिंग राखत बाप्पाचा उत्सव साजरा करत आहेत. महाराष्ट्रासह भारतात मोठ्या जल्लोषात बाप्पाचे स्वागत झाले. इतकेच नव्हे तर सातासमुद्रापार अमेरिकेतही बाप्पा विराजमान झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या पेणकर कुटुंबीयांनी गणपती बसवला आहे.
पेणकर कुटुंबीय यंदाचा गणेशोत्सव न्यूयॉर्क शहरात साजरा करत आहेत. विशेष म्हणचे घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून त्यांनी सजावट केली आहे. घरात येणारे भेट वस्तूंचे खोके तसेच सजावटीच्या वस्तू जपून ठेवून वैशाली पेणकर व मुलगी रिजुल पेणकर यांनी पर्यावरण स्नेही सजावट साकारली आहे. शेंडीचा नारळ अमेरिकेमध्ये मिळत नाही आणि घर लाकडाचे असल्याने तो फोडताही येत नाही म्हणून या कुटुंबाने युक्ती लढवत कलशात नारळ ऐवजी शहाळ ठेवले आहे. शहाळ हे खूप दिवस टिकते त्यामुळे हाच पर्याय उत्तम होता. नंतर या शहालाचे पाणी मुलांना प्रसाद म्हणून दिला जाईल, असे वैशाली यांनी सांगितले.
अमेरिकेमधील बाजारपेठेत दरवर्षी गणेश मूर्ती विक्रीसाठी येत असतात. पण यंदा कोरोनामुळे मूर्ती न आल्याने ज्या भारतीय विक्रेत्यांकडे गेल्या वर्षीच्या मूर्ती शिल्लक होत्या. त्याच त्यांनी विक्रीला ठेवल्या होत्या. वैशाली आणि संदेश यांना यातील शिल्लक असलेली एक गणेश मूर्ती मिळाली. त्यांनी ती विक्रेत्याला फोन करुन मिळवली. महत्वाची म्हणजे, त्यांनी ही मूर्ती गणेश चतुर्थीच्या दहा दिवस आधीच आणली असल्याचे वैशाली यांनी सांगितले.