ठाणे: प्राप्त माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांना भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरात अनधिकृतपणे 'हयात हॉस्पिटल' नावाने रुग्णालय सुरू असल्याची तक्रार मिळाली. काही दक्ष नागरिकांनी महापालिकेच्या खासगी हॉस्पिटल तक्रार निवारण समितीला प्रत्यक्ष भेट देऊन ही तक्रार केली होती. या आधारे समितीने 'हयात हॉस्पिटलला' भेट दिली. दरम्यान हॉस्पिटलने 'महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन' (सुधारित) नियम २०२१ अन्वये रुग्णालयाच्या नोंदणीसाठीची आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात सादर न करता रुग्णालय अवैधरित्या सुरू केल्याचे समितीच्या निदर्शनास आले.
तरीही बेकायदा हॉस्पिटल सुरूच: त्यानंतर १८ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी 'हयात हॉस्पिटल' प्रशासनास पुढील आदेश होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्यासाठी नोटीस बजावली. त्याचप्रमाणे 'मुंबई शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९' चे कलम ६ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते; मात्र तरीही 'हयात हॉस्पिटल्या' नजमा सय्यद या परिचारिकेने कामकाज सुरूच ठेवले. अखेर (आज) गुरुवारी २० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात या हॉस्पिटलला सील केले.