ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना दिसत असून मृत्यदराचा आकडा कमी होत आहे. 2021 या नवीन वर्षात कोरोनावर लस येणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयारी देखील करण्यात आली आहे. सर्वप्रथम ही लस आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असली तरी ठाणेकर सर्वसामान्य नागरिकांना ही लस पोहोचण्यापर्यंत एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. एकीकडे लसीची तयारी पूर्ण झाली असली तरी मात्र शासनाकडून लसीचा येणाऱ्या साठा बघता सुरवातीला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना दोन टप्यात देण्यात येणार आहे.
कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार असून शासनाच्या निर्देशानुसार तसेच वर्गवारीनुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपर्यंत लस पोहचण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे शर्मा यांनी सांगितले. लस आली की ती सर्वप्रथम आरोग्य सेवेतील सुमारे 6 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांना ही लस देण्याची तयारी करण्यात आली असून दोन टप्यात ही लस देणार असल्याचे ठाणे महापलिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बोलताना सांगितले.