महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाळ्यासाठी ठाणे महापालिका सज्ज, आपत्ती काळात सर्व विभागांना एकत्रपणे काम करण्याचे आयुक्तांचे आदेश - नालेसफाई

पावसाळ्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली असून आपत्ती काळात सर्व विभागांना एकत्रपणे काम करावे, असे आदेश आज पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांची बैठक

By

Published : May 15, 2019, 1:14 PM IST

ठाणे - पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज झाली असून ३१ मेपर्यंत नालेसफाई आणि रस्ते दुरूस्ती करा, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच १५ मेनंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, यासाठी सतर्क रहावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ठाणे महापालिका

नागरी संशोधन केंद्र, ठाणे येथे सर्व जिल्हास्तरीय शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, वाहतूक पोलीस कार्यालय, आरटीओ, महावितरण, एमटीएनएल, महानगर गॅस यासारख्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

शहरात १५ मेनंतर रस्त्यावर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील. तसेच सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरूस्तीची जी कामे सुरू आहेत, ती ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. यावेळी शहरातील प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करून सी १ आणि सी २ इमारती खाली करण्याचे तसेच ज्या भागात दरड कोसळयाचा संभव आहे, अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनादेखील स्थलांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.

पावसाळ्यात महावितरण, पालिकेचा विद्युत विभाग यांनी संयुक्तपणे काम करताना ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत, तेथे तत्काळ चेंबरची झाकणे बसवणे, चर बुजवणे आणि खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभागसमितीनिहाय १ जेसीबी मशीन आणि १ पोकलेन मशीन पुरवण्यात यावे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचावे यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा विकेंद्रीत करून ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच उद्यान विभागाने वृक्षफांद्या छाटणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच छाटलेल्या फांद्या त्वरित उचलण्याची कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले.

आरोग्य विभागाने पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रे या ठिकाणी आवश्यक तो औषधसाठा करावा आणि प्रतिबंधात्मक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन २४ तास सुरू राहिल याकडे विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागानेदेखील याबाबत सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांनी वाहतूक पोलीस विभाग, महानगर गॅस, महावितरण, रेल्वे तसेच जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून आपत्तीचा सामना करण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details