ठाणे - यंदा कोरोनाने जगभर घातलेला धुमाकूळ पाहता, एकूणच गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून घरगुती गणपती मूर्तीची उंची 2 फुटापर्यंत, तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फूट उंच मूर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून श्रीगणेश मूर्ती दान स्वीकृती केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक राहणार असून मंडपातील प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येणार आहे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी आपली मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. यामध्ये श्रीगणेश मूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे, आगमनाच्या आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त तीन लोक असावेत, तसेच सार्वजनिक गणेश आगमन-विसर्जनावेळी एका मंडपात ५ पेक्षा जास्त लोक नसावे, शक्यतो गर्दी टाळावी, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात यावे, अशा महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेश मूर्तींचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात यावे, असे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा पीओपी गणपती मुर्तीबाबत विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करताना महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्जनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मात्र, तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला, तर तो कमीत कमी दिवस साजरा करावा, गणपतीची मूर्ती 4 फुटाच्या मर्यादेत असावी, मंडळांनी मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असून मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये एकाचवेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच मंडपामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे.