ठाणे - एका कुटुंबातील १० जणांसह त्यांच्या शेजारील दोघे, असे १२ जणांनी ३६ हजार रुपये खर्च करून खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगितले. मात्र, अहवाल त्यांच्या हातात दिले नाहीत. त्यानंतर महापालिकेकडून त्यांची चाचणी करण्यात आली. मात्र, ती निगेटिव्ह आली. त्यामुळे खासगी लॅब आणि रुग्णालयामध्ये मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा आरोप मुंब्र्यातील या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच महापालिकेकडून या थायोरोकेअर लॅबवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंब्र्यातील एका कुटुंबातील किडनी आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील १० जण आणि शेजारचे दोघे अशा १२ जणांना थायरोकेअर या खासगी लॅबमध्ये चाचणी केली होती. त्यानंतर सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना लॅबकडून अहवाल देण्यात आला नाही. या सर्व प्रकारानंतर महापालिकेने त्यांना दहा दिवसांसाठी क्वारंटाईन केले. याठिकाणी चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे ठाणे महापालिकेने देखील या खासगी लॅबचे अहवाल योग्य नसल्याचे सांगत थायरोकेयर लॅबवर कारवाई केली आहे. तसेच आमचे पैसे परत देण्याची मागणी या कुटुंबीयांनी केली असून अशा लॅबवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी विनंती देखील या कुटुंबीयांनी केली आहे.