ठाणे- लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता संपताच पाणी चोरांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी सुमारे ३५० अनधिकृत नळ कनेक्शन कापण्यात आले आहेत. या पाणी चोरांच्या विरोधात नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिवा परिसरात पाणी चोरांचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत असताना राजकीय वरदहस्त असल्याने पाणी चोरांवर कारवाई होत नव्हती. मात्र, निवडणुका झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दिवा परिसरात स्थानिक पाणी माफियांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या पाईपलाईन मधून अनधिकृत कनेक्शन घेतली आहेत. एकीकडे या भागात भीषण पाणी टंचाई असताना पाणी माफियांकडून विनापरवाना राजरोसपणे कनेक्शन घेऊन पाण्याचा वापर करण्यात येत होता.