ठाणे -इस्लाम धर्माचे संस्थापक, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रसिद्ध करणार्या शिक्षकाचे समर्थन करणारे तसेच इस्लाम समुदायाला दहशतवादी म्हणणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निषेधार्थ मुंब्रा येथील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण आणि रिकॉर्ड फेडरेशन यांच्यावतीने शनिवारी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच, त्यांचे छायाचित्र रस्त्यावर चिकटवून ते पायाने तुडविण्यात आले.
फ्रान्समधील एका नियतकालिकामध्ये एका शिक्षकाने काढलेले अल्लाहचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून छापण्यात आले होते. अल्लाह आणि त्यांचे प्रेषित हे निराकार-निरामय असल्याने त्यांचे चित्र छापण्यास इस्लाममध्ये मान्यता नाही. त्याविरोधात फ्रान्समधील मुस्लिम बांधवांनी आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चित्र काढण्याच्या वृत्तीचे समर्थन करुन समस्त इस्लाम धर्मियांना दहशतवादी असे संबोधले. त्या निषेधार्थ सर्व इस्लामी राष्ट्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर अश्रफ (शानू) पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.