ठाणे -राज्यासह ठाण्यात देखील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रचंड हल्ला सुरू केला आहे. घटनास्थळी जाऊन विरोधक आरोप करत असल्याने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. टीका करण्यापेक्षा विरोधकांनी केंद्रातून ऑक्सिजन आणि गुजरातमधून रेमडेसिवीर आणून दाखवावे, असा टोला म्हस्के यांनी लगावला आहे. सर्वत्र परिस्थिती गंभीर असून ठाणे महापालिका नागरिकांना सेवा पुरवत आहे. या कठीण काळात विरोधकांनी देखील फक्त टीका न करता आमच्या बरोबर येऊन काम करावे, अशी हात जोडून म्हस्के यांनी विनंती केली.
'मी घरी येऊन पाय धुवून पाणी पिईन'
गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्याची आरोग्य परिस्थिती खालावत चालली आहे. ही परिस्थिती सध्या राज्यभर असून मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या देखील वाढत आहे. महापालिका आणि सत्ताधारी रात्रंदिवस काम करून करत असून ठाणेकर नागरिकांची काळजी आम्हाला देखील असल्याचे यावेळी म्हस्के यांनी बोलताना सांगितले. मात्र विरोधक फक्त आरोप करत असून मदतीला पुढे येत नाहीत. सत्ताधारी म्हणून आम्ही प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र आम्ही कुठे कमी पडत असू तर आमच्या मदतीला या, काही सूचना करा टीका करू नका. ठाणेकरांना सेवा उपलब्ध करून द्या "मी घरी येऊन पाय धुवून पाणी पिईन" असे भावनिक वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
कोरोना काळात महापलिकेने उत्तम काम करून दाखवले आहे. काही शहरांची तर कोरोना काळात काम करण्याचा ठाण्याच्या बोधदेखील घेतला आहे. तसेच ज्या शहरात भाजपाची सत्ता आहे, त्या शहरात यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आम्ही प्रत्येकजण राजकारण न करता आमच्या शहराकडे लक्ष देत असल्याचे सांगत कृपया करून राजकारण करू नका, मदतीला या अशी विनंती महापौर म्हस्के यांनी विरोधकांना केली आहे.