ठाणे -कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का हटवले? याचा महाविकास आघाडीने येत्या 8 दिवसात खुलासा करावा, अन्यथा राज्यात कृषीमंत्र्यांना फिरकू दिले जाणार नाही; असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला.
आबासाहेब पाटील (अध्यक्ष, मराठा क्रांती ठोका मोर्चा) शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे नव्हते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारी योजनेला कुणाचे नाव द्यायचे हा सर्वस्वी सरकारचा अधिकार आहे. तरी नाव का बदलले हे विचारणे जनतेचा अधिकार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हटवण्याच्या घोषणेबाबत कसलेही कारण द्यावे, असे राज्यातल्या महाआघाडी सरकारला वाटलेले नाही. हा छत्रपतींचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...
ज्या राजाच्या शासन पद्धतीला जगात मान आहे. ज्या शिवरायांच्या राजमुद्रेला प्रमाण मानून महाराष्ट्र शासनाची वाटचाल सुरू आहे. त्या आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून टाकावे, ही अत्यंत अपमानास्पद बाब आहे. सत्तेत आल्यापासून महाआघाडी सरकारचा मराठा समाजावर राग दिसत आहे. सर्वप्रथम या सरकारने सारथी संस्थेचा खेळखंडोबा केला. त्यानंतर, मराठा आरक्षण मिळवून देणारे वकील एकारात्रीत गुपचूप हटवले आणि आता या योजनेचे नाव बदलण्यात आले.
हेही वाचा -पालिका महालक्ष्मी येथे बांधणार केबल दोरखंडांचा भव्य पूल, 'इतका' होणार खर्च
या योजनेचे नाव का बदलण्यात आले? कोणत्या मंत्र्याने छत्रपतींचे नाव काढून टाकायची शिफारस केली?छत्रपती शिवाजी महाराज यांना ठाकरे सरकार कुळवडी भूषण मानत नाही का? ठाकरे सरकारला छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे वाटत नाहीत का? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही केलं की नाही? आघाडी सरकारचा मराठा समाजावर राग कशासाठी आहे? आणि कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव किती दिवसात देणार? महाआघाडी सरकारने याचा लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा कृषिमंत्र्यांना याबाबत जाब विचारला जाईल आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल, असा इशाराही आबासाहेब पाटील यांनी दिला.