ठाणे -उशिरा कोविड टेस्ट करणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी मिशन झिरोअंतर्गत कोविडचा प्रादुर्भाव कमी करणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मिशन झिरो ही मोहीम राबवली जात आहे. महापालिका प्रशासन, भारतीय जैन संघटना, देश अपना ये व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमानाने एकत्रितरित्या राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचा प्रारंभ कल्याण स्पोर्ट्स क्लब येथून पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लोकांच्या सहभागाने हे कोरोनाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. रुग्ण मृत्यू आणि कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या सहभागही महत्त्वाचा आहे. काम करणाऱ्या लोकांवर लोक आरोप करतात हे दुर्दैव आहे, रुग्णांसाठी संवाद साधणे महत्त्वाचे असून कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी चतु:सूत्रीचा वापर करावा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
मिशन झिरोअंतर्गत जनजागृतीसाठी पाच मिनी बसेसना हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रचाररथ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वत्र संचार करणार आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमधील सहकारी गृहनिर्माण संस्था, इमारती, चाळी, झोपडपट्ट्या या सर्व ठिकाणी फिरून संशयित रुग्ण तसेच 60 वर्षांवरील व्यक्ती त्याचप्रमाणे विविध दूर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करतील. तसेच अशा रुग्णांना महापालिकेने निर्धारित केलेल्या कोविडच्या अँटीजेन टेस्ट सेंटरमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्याचे काम करणार आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र फिरून संशयित रुग्णांची अँटीजेन स्टेट करण्याचे कामही या मोहिमेत पार पाडले जाणार आहे.
गुरुवारी आढळले 330 नवे रुग्ण
दरम्यान, गेल्या 24 तासांत नव्याने 330 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिका हद्दीत 475 रुग्णांचा मृत्यू झाला असून यासाठीच मिशन झिरो ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापौर वनिता राणे, पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, एम सी एच आय चे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन उपस्थित होते.