मुंबई - ठाण्यात आज ( गुरुवार ) 4.35 च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली ( Thane Gas Cylinder Explosion ) आहे. दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडपट्टीतील 6 झोपड्यांना आग लागली. यामध्ये झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा जखमी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, ठाण्यातील घोलाई नगर येथील गणेश वेल्फेअर सोसायटी परिसरात 2 सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये 6 झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, फॉरेस्ट विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशमन दलाचे १ फायर इंजिन आणि १ रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. सध्या येथील आग विझवण्यात आली असून, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सिलेंडरचा स्फोट होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.