ठाणे Thane Crime : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याचा शार्प शूटर विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अरब आखाती देशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला एलओसीच्या आधारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांकडं सुपूर्द केलं. त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात 2017 मध्ये खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात आरोपी विजय हा फरार होता.
10 कोटींची मागितली खंडणी : कुख्यात खंडणीखोर रवी पुजारी याच्यासाठी काम करणारा शार्प शूटर विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट हा आखाती आणि विदेशात मागील अनेक वर्षांपासून लपून बसला होता. याच आरोपीनं ठाण्यातील एका बिल्डरकडं सन 2017 मध्ये 10 कोटींची खंडणी मागितली होती. तसंच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विजय उर्फ तांबट यानं बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी काही शार्प शूटर पाठविले होते. मात्र पोलिसानी त्यांना अग्निशस्त्र आणि काडतुसांसह अटक केली होती. तेव्हा पासून कासारवडवली पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा हे आरोपी विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देऊन पलायन करण्यात तो यशस्वी ठरला.