ठाणे - भिंवडी तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गोदाम पट्ट्यात नियमांचे पालन होत नसल्याने, मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गोदाम पट्ट्यातील अत्यावश्यक सेवेतील गोदामे वगळता इतर गोदामांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. यात कामगारांची आरोग्य विषयक सुविधांची काळजी घेण्यात येते की नाही, हे तपासले जाणार आहे. तसेच याची काळजी न घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास सर्व गोदाम व्यवसाय बंद करण्याबाबतचे संकेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ते भिवंडी उपविभागीय कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
भिवंडी तालुक्यातील खारबाव, दिवे अंजुर पडघा, कोनगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात, गोदाम व्यवसाय फोफावलेला आहे. या परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. आतापर्यंत या भागात 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भिवंडी ग्रामीण भागात वाढती कोरोना रुग्णसंख्या व त्यावरील उपाययोजना या संदर्भात भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरामण सोनावणे, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांसह तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभागातील अधिकारी यांचे संयुक्त पथक गोदामांचे सर्वेक्षण करणार असून त्या माध्यमातून गोदाम चालक कामगारांची आरोग्य विषयक काळजी घेत नसल्यास त्यांच्यावर गोदाम बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. या आढावा बैठकीत भिनार येथील 200 बेडचे डिसीएचसी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय गणेशपुरी येथील बंद अवस्थेत असलेले नित्यानंद हॉस्पिटल येथे 400 बेडची व्यवस्था करण्यात येत असून भविष्यात एक ही रुग्ण उपचारा विना राहू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.