ठाणे -ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या आहेत. मतदारांनी महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्याबद्दल बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे यांनी मतदारांचे आभार मानले.
'मतदारांनी त्यांना नाकारले'
परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यादोन्ही मंत्र्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करूनही बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले, असे भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले. सहकार पॅनलच्या गेल्या टर्ममधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनलमध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील, असा विश्वास व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी
या निवडणुकीत बहुजन विकास ९, भाजपा ७ व अन्य २ असे सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले आहे. ठाणे जिल्हा बँकेवर मागील अनेक वर्षांपासून कपिल पाटील, हितेंद्र ठाकूर आणि किसन कथोरे यांची सत्ता आहे. त्यांनी यावेळीही ती कायम ठेवली.