ठाणे Shambhuraj Desai News :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी (8 जानेवारी) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी रस्त्यांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात रस्त्याची कामं अर्धवट असून अनेक ठिकाणी मोठ-मोठे अपघात होत आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कामाबाबत आमदारच तक्रार करत असतील तर राज्यात काय परिस्थीत असेल? असा सवालही आमदारांनी यावेळी उपस्थित केला.
ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश :रस्त्यांची कामं पूर्ण व्हावीत या दृष्टीनं ठेकेदारांकडून किरकोळ काम सुरू असल्याची तक्रार आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडं केली. यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. ज्या रस्त्याची कॉलिटी कंट्रोल तपासणी झाली नसेल त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी. तसंच ज्या रस्त्याची लाईफ साधारण 5 ते 7 वर्ष आहे. पण ते रस्ते वर्षभरातच खराब झाले तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मंत्री तथा पालकमंत्री देसाई यांनी दिले.