महाराष्ट्र

maharashtra

By PTI

Published : Jan 5, 2024, 11:40 AM IST

ETV Bharat / state

स्मशानभूमीत मांजरावर अंत्यसंस्कार, मग काय झालं? वाचा तुम्हीच

Thane Crime : काही दिवसांपूर्वी भाईंदर येथील स्मशानभूमीत मांजरावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली. त्यानंतर एका महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

cat
मांजर

ठाणे Thane Crime : भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत मांजरावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. त्यानंतर तातडीनं या स्मशानभूमीत नियुक्त असलेल्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीनं कामवरुन कमी करण्यात यावं, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून कंत्राटदाराला देण्यात आले. तसेच, या घटनेबाबत तातडीनं लेखी खुलासा करण्यास यातील कंत्राटदार कंपनीला सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे अशक्य : भाईंदर येथील स्मशानभूमीत एका संस्थेच्या माध्यमातून मृत पाळीव मांजरावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी या घटनेचा व्हिडिओ करुन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती काढल्यानंतर या संस्थेकडून पैसे घेऊन असे अंत्यसंस्कार केल्याचं उघड झालं. त्यामुळे येथील स्मशानभूमीत नियुक्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे अशक्य आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन येथील तीन कर्मचारी निलंबीत करण्यात आले. दरम्यान, आयुक्त संजय काटकर यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वच्छता अधिकाऱ्याची नेमणूक : या स्मशानभूमीत नियुक्त असलेले निलेश पाटील, हनुमान चव्हाण आणि बबन तुळे या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरुन कमी करण्याबाबत उपायुक्त रवी पवार यांनी संबंधित कंत्राटदार कंपनीला आदेश दिले. कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं घडलेली ही घटना गंभीर आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरुन कमी करण्यात यावं. तसेच, या घटनेसंदर्भात लेखी खुलासा करण्यात यावा, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आलंय. त्याचप्रमाणं मांजरावर अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थेचे सदस्य आणि स्मशानभूमीतील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील उपमुख्य स्वच्छता अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

उशिरा तक्रार दाखल : या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना 22 डिसेंबरच्या संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली. दरम्यान, उशिरा तक्रार का दाखल झाली याचे कारण पोलिसांनी सांगितले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details