ठाणे Thane Crime -आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमधून 16,180 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून पेमेंट गेटवे कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका पेमेंट गेटवे सेवा पुरवठादार कंपनीला बसला आहे.
खाते हॅक करून 25 कोटी रुपये लुटले - नौपाडा पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पेमेंट गेटवे कंपनीची फसवणूक अनेक दिवसांपासून सुरू होती. एप्रिल 2023 मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून 25 कोटी रुपये लुटल्याची ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्याचा तपास सुरू असताना या मोठ्या लुटीची घटना समोर आल्याचं नौपाडा पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांनी तपास केला असता, 16,180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक उघडकीस आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. त्याचा एफआयआरमध्ये उल्लेख असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
सायबर एक्सपर्ट यांच्या मदतीनं तपास सुरू-ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी शुक्रवारी संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदार, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. खोट्या कराराचा वापर करत भागीदारीमध्ये कंपनी तयार करून 260 पेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट तयार करून हे पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. या एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार आल्याच समोर आल्यावर आता पोलीस सायबर एक्सपर्ट यांच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास करत आहेत
असा गुन्ह्याचा उलगडा झाला-25 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा खानापूर श्रीनगर पोलीस ठाण्यात 16 जून रोजी दाखल करण्यात आलेला होता. याचा तपास करताना सायबर सेलने गुजरातमधून दोघांना अटक केलं होतं. या प्रकाराच्या तपासात एक कोटी 39 लाख रुपयांचा एक व्यवहार पोलिसांना समजला. मग पोलिसांनी अधिक तपास करून या गुन्ह्याची उकल केली. याचा तपास करत असताना पोलिसांनी बेलापूरमधल्या एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तपास केला असता अनेक खोटे कागदपत्र मिळाली आहेत. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी बनावट कागदपत्र वापरून त्याचा खोटा वापर करत करारनामे तयार केल्याचेदेखील पोलिसांना समोर आढळून आले. दोन आरोपी हे बँकिंग क्षेत्रातील आहेत. त्यांना रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर या कामांचा अनुभव देखील आहे. याच अनुभवाचा फायदा घेत त्यांनी हा घोटाळा केला आहे.
हा गुन्हा मागील अनेक महिन्यांपासून पाच आरोपी करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून आम्ही कागदपत्र पुरावे गोळा करण्याचे काम करत आहोत. सायबर पोलिसांच्या मदतीने आणखीन अनेक आरोपी शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत -नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ