महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Firing At Drinking Party : गुन्हेगारांच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी, आरोपी फरार - सुनील उर्फ टक्कावर गोळीबार

गुन्हेगारांची पार्टी सुरु असतांना त्यांच्या वाद होऊन गोळीबार झाल्याची घटना बदलापूर जवळील कात्रप परिसरात घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील प्रजापती उर्फ टक्का असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

Firing At Drinking Party
Firing At Drinking Party

By

Published : Jul 23, 2023, 7:03 PM IST

ठाणे :गुन्हेगार मित्रांची दारू पार्टी सुरू असतानाच काही कारणावरून वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका गुन्हेगारवरच गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात असलेल्या पनवेल हायवे रोडच्या लगत असलेल्या रानमाळात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी फरार झालेल्या हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. सुनील प्रजापती उर्फ टक्का असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हेगारांमध्ये काही कारणावरून वाद :पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गोळीबारात जखमी झालेला सुनील प्रजापती उर्फ टक्का हा उल्हासनगर शहरातील आझाद नगरमध्ये राहतो. त्याची या भागात मोठी दहशत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय त्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला नुकतीच तडीपार करण्याची नोटीसही पोलिसांकडून बजावण्यात आली आहे.

सुनील उर्फ टक्कावर गोळीबार :जखमी गुन्हेगार सुनील उर्फ टक्का हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बदलापूर पूर्वेच्या कात्रप भागातील पनवेल हायवे रोड लगत असलेल्या रानमाळात मित्रांसोबत दारू पार्टीत गेला होता. त्यावेळी दारू पार्टी सुरू असतानाच गुन्हेगारांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सुनील उर्फ टक्कावर गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी त्याच्या खांद्यावर लागून शरीरात घुसली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुनील उर्फ टक्का याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करत काही दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

आरोपी विरोधात गुन्हा :गोळीबाराच्या घटनेला ३६ तास उलटून गेली. मात्र गोळीबार करणारे गुन्हेगार कोण होते. याचा तपास अद्यापही पोलीस करत आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील गुन्हेगार पकडले जात नाही तोपर्यत नेमका गोळीबार कोणी केला? हे कळायला मार्ग नाही. गुन्ह्याचा अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक बदलापूर पूर्व पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -Child Fell into Borewell : खेळता खेळता चाळीस फूट खोल बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षाचा मुलगा, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details