नवी मुंबई :दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. मुलीशी बोलणे होत नसल्याने, मुलीशी बोलणे करून दे असा तगादा लावल्याने जावयाने सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे खुनी जावयाने 11 महिन्यापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचाही खून केल्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधित आरोपीस त्याच्या तीन मित्रांसह नवी मुंबई परिमंडळ 2 च्या उरण पोलिसांनी गजाआड केले आहे. गेल्या वर्षी हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटला होता. तो माजी सैनिक असून त्याला पत्नी व सासूच्या दुहेरी हत्याकांडातून पुन्हा अटक करण्यात आली. मयुरेश अजित गंभीर (43) असे आरोपीचे नाव आहे
नक्की काय घडले :सारडे गावाच्या हद्दीत लाल साडी नेसलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. मृतदेहा शेजारी महिलेच्या चष्म्याचे पाऊच आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासातून संबंधित महिला ही डोंबिवली परिसरातली रहिवासी असल्याचे समजले. अधिक चौकशीत शेजाऱ्यांनी संबंधित महिलेला तिचा अलिबाग पोयनाड येथे राहणारा जावई मयुरेश अजित गंभीर (43) याचा फोन आला, अशी माहिती दिली. 9 जुलैला संध्याकाळी पाचच्या दरम्यान मृत महिला तिच्या डोंबिवली येथील घरातून निघाली, असेही शेजाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी मयुरेश अजित गंभीर याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
चाकूने केली हत्या :मयुरेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो तडीपार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेत आरोपी मयुरेश याला मानपाडा खोणी डोंबिवली येथून अटक केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माहिती दिली. आरोपीने तीन साथीदारांसह सासू भारती आंबोकर (55) हिला मुलगी प्रीती हिची भेट करून देण्याच्या निमित्ताने कट करून इनोवा गाडीत बसवले. पनवेल परिसरातील साई खिंडीत पिस्तोलने दोन गोळ्या झाडून जखमी केले. उरण येथील सारडे पिरकोन रस्त्यावर आल्यावर तिच्या गळ्यावर चाकू मारून ती मरण पावल्याची खात्री करून तिला तेथे टाकून पलायन केल्याची कबुली संबंधित महिलेच्या जावयाने दिली.
पत्नीचा खून :मृत भारती आंबोकर हिची मुलगी प्रीती (35) व आरोपी मयुरेश गंभीर यांचा विवाह झाला होता. प्रीती ही मयुरेशची दुसरी पत्नी होती. मयुरेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तो एका गुन्ह्यात जेलमध्ये अटक होता. मयुरेशने प्रीतीजवळ नऊ लाख रुपये ठेवण्यास दिले होते. मयुरेशच्या सुटकेसाठी पैशाची गरज होती. मात्र प्रीतीने तिच्या जवळ पैसे नाही असे सांगितले. त्यामुळे आरोपी मयुरेशला अधिक काळ जेलमध्ये राहावे लागले. मयुरेशच्या डोक्यात प्रीतीविषयी राग खदखदत होता. याशिवाय मयुरेश हा प्रीतीच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. जेलमधून सुटून आल्यावर, सहलीसाठी घेऊन जातो असे निमित्त करून, ऑगस्ट 2022 मध्ये अलिबाग साज व्हीला वाळंज परोडा नागाव हॉटेलवर नेले. प्रीतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मयुरेशने दिलीप गुंजलेकर (वय 42), दीपक उर्फ बाबू (वय 38) तसेच आबरार अन्वर शेख ( वय 35) या तीन मित्रांची मदत घेऊन प्रीतीचा मृतदेह वडखळ येथील धरमतर खाडीत नेऊन टाकला. आरोपी मयुरेशने पुरावा नष्ट केला.