ठाणे- रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप व मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. यामध्ये २ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
ठाण्यात कारच्या काचा फोडून कारटेप चोरणारी टोळी गजाआड जगन्नाथ रामनाथ सरोज (46), दिनेश कश्यप (33) असे चोरट्यांची नावे आहेत. हे टोळके कारमधील महागडे कारटेप काही हजारांत मुंबईच्या चोर बाजारात विकत असते. पोलीस तपासात आतापर्यंत तब्बल 43 गुन्ह्याची उकल झाली आहे. याप्रकरणी आरोपींना ठाणे न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
हे वाचलं का? -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत
ठाणे, मुंबई व परिसरात कारच्या काचा फोडून कारटेप आणि इतर मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश मिळाले होते. त्यानंतर वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने या टोळक्याला गजाआड केले. त्यांच्या चौकशीत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली. त्याचबरोबर ठाणे शहर, मुंबई व उपनगरे, नवीमुंबई, ठाणे ग्रामीण, पुणे शहर, रत्नागिरी अशा विविध 45 ठिकाणी या आरोपींना चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
हे वाचलं का? -नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त
टोळीने शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील कासारवडवली, चितळसर, कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, ठाणे नगर, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 14 आणि ठाणे ग्रामीण, मुंबई शहर हद्दीतील 29 अशा 43 गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेल्या कारटेपपैकी 16 महागड्या कारटेप हस्तगत करण्यात आल्या आहेत. यांचा एक साथीदार मुंब्र्यातील असून तो कारटेप विक्री करण्यास मदत करीत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.