ठाणे :भिवंडीत चिमुरडीचा खून करून धक्कादायक घटना परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर उघडकीस आली होती. याप्रकरणी सुरवातीला भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. चिमुरडीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याने निष्पन्न झाले. पोलिसांनी नराधामा विरोधात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या चिमुरडीचे आई-वडील हे दोघेही भिवंडीतील एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जात आहेत. नेहमीप्रमाणे 13 सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. हत्या झालेल्या सहा वर्षीय मुलीसोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता. त्यावेळी चिमुरडी सकाळपासूनच बेपत्ता होती. सायंकाळी आई- वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली होती.
बकेटमध्ये आढळला होता मुलीचा मृतदेह-पोलिसांनी 14 सप्टेंबरला नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्येसुद्धा सर्च ऑपरेशन घेतले होते. परंतु त्याठिकाणी चिमुरडी आढळून आली नव्हती. मात्र शुक्रवारी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका कुलूप बंद घर असलेल्या चाळीतील खोलीमध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते.