ठाणे- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात सध्या लॉकडाऊन शिथील केला असला तरी, न्यायालयीन कामकाज करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे, न्यायालयीन कामकाज एकाच सत्रात चालवावे, अशी विनंती ठाणे जिल्हा वकील संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाली असून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज 19 जून ते 1 जुलैपर्यंत सकाळच्या एकाच सत्रात चालवण्यात येणार आहे.
ठाणे न्यायालयाचे कामकाज आता एकाच सत्रात, जिल्हा वकील संघटनेची मागणी मान्य - ठाणे न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात
सध्या लॉकडाऊनमुळे न्यायालयीन कामकाज एकाच सत्रात चालवावे, अशी विनंती ठाणे जिल्हा वकील संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाली असून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज 19 जून ते 1 जुलैपर्यंत सकाळच्या एकाच सत्रात चालवण्यात येणार आहे.
वकिलांच्या अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले. ठाणे जिल्हा वकील संघटनेत 4 हजार सदस्य असून दररोज सुमारे दीड हजार वकील ठाणे न्यायालयात उपस्थित असतात. सध्या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात फक्त रिमांड, जामीन अर्ज व अतिमहत्त्वाचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे, न्यायाधीश मंडळींसह वकील व न्यायालयीन स्टाफ या कठीण काळातही सेवा देत आहेत. मात्र, ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने न्यायालयीन कामकाज सकाळी 11 ते 2 असे तीन तास एकाच सत्रात चालवण्याची मागणी केली गेली होती.
आता जिल्हा मुख्य न्यायाधीश यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, 19 जून ते 1 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शहापूर, पालघर, जव्हार, वाडा, डहाणू व मुरबाड वगळता सर्व न्यायालयामध्ये केवळ एका शिफ्टमध्ये कामकाज करण्याचे आदेश दिलेले आहेत. या कालावधीत केवळ अतिमहत्त्वाचे काम चालणार असून सर्व प्रकारचे दावे दाखल करण्यासही परवानगी दिलेली आहे. दरम्यान, संघटनेने सुचवलेल्या बदलांचा विचार करून न्यायालयीन वेळेत वकिलांना बसण्याकरता जिल्हा विधी केंद्राच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील हॉल व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशांत कदम यांनी याबद्दलची माहिती दिली.