ठाणे - नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. काही दिवसांपूर्वीच गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने शारीरिक व मानसिक छळ करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. तसेच गजानन काळे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोपही त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे फरार आहेत.
काय आहे प्रकरण -
काही दिवसांपूर्वीच गजानन काळेंविरुद्ध त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शारीरिक व मानसिक छळ, जातीवाचक बोलणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या १३ वर्षांपासून गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा तसेच त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे गजानन काळे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले होते.