महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढली; शिवसेनेला घरचा आहेर!

'मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात अधिकारी स्वतःला धन्य मानत आहेत. म्हणूनच रुग्णाच्या होणाऱ्या लूटमारीवर महापालिका अधिकारी डोळेझाक करीत आहेत. रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांना जबाबदार मानावे की, महापालिका अधिकाऱ्यांना,' असा सवाल शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेला घराचा आहेर मिळाला आहे.

खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढली
खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढली

By

Published : Sep 10, 2020, 3:34 PM IST

Updated : Sep 10, 2020, 5:35 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत ३२ हजार कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पार झाली आहे. त्यातच आजही दरदिवशी ४५० ते ५०० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. दुसरीकडे कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी शासनाने आणि महापालिकांनी खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. मात्र, त्या खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. खासगी रुग्णालय चालवणाऱ्या मालकांची मुजोरी वाढली आहे का, असा सवाल शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी उपस्थित करून शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.

याबाबत बोलताना 'मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात अधिकारी स्वतःला धन्य मानत आहेत. म्हणूनच रुग्णाच्या होणाऱ्या लूटमारीवर महापालिका अधिकारी डोळेझाक करीत आहेत. रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांना जबाबदार मानावे की, महापालिका अधिकाऱ्यांना? असाच एक प्रकार माझ्या समोर आला. कल्याण पूर्व आनंदवाडीत असलेल्या साई स्वस्तिक नावाच्या खासगी रुग्णालयात गेल्या ११ दिवसांपासून एक कोरोनाबाधित महिला उपचार घेत होती. त्याचे जवळपास ४ लाखांच्या घरात बिल झाले, परंतु तिची तब्येत खालावल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने हलवण्यास सांगितले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला', असे गायकवाड म्हणाले.

नातेवाईकांनी घडलेला प्रकार नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कानावर घातला असता त्यांनी थेट रुग्णालय गाठले व तेथील हजर असणाऱ्या व्यवस्थापनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही सकारात्मक उत्तरे दिली नाहीत, असे ते म्हणाले. 'तिथे गेल्यानंतर अजून काही बाबी समोर आल्या. त्या म्हणजे या हॉस्पिटलमध्ये मृत पावणाऱ्या रुग्णाला देण्यात येणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आले. हॉस्पिटल ICU रूममध्ये ज्या खाटा ठेवण्यात आल्यात, त्या दुय्यम दर्जाच्या खाटा असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या हॉस्पिटलमध्ये येथील कर्मचारी दारू पीत असल्याचे कळले आहे. याखेरीज आज हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे महिला मृत पावली, तसेच अजूनही ३ ते ४ रुग्ण या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत पावले आहेत,' असे गायकवाड यांनी सांगितले.

यापूर्वीही महेश गायकवाड यांनी श्रीदेवी हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभाराबद्दल आंदोलन केले होते. श्रीदेवी रुग्णालयाने कोरोनाबाधित महिलेकडून जास्तीचे बिल आकारले होते. रुग्णालयाने तिच्या बिलात कोविड कचऱ्याच्या विल्हेवाटीचे शुल्कही आकारले होते. तसेच तिला डिस्चार्ज दिला नव्हता. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक गायकवाड यांनी पीपीई किट घालून महिला रुग्णास उचलून घरी नेले हाते. तसेच रुग्णालय प्रशासनास जाब विचारला होता. याप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी मनपा आयुक्तांकडे गायकवाड यांनी केली होती. यानंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे मनपाने रुग्णालयास नोटीस पाठवून विचारणा केली होती. मात्र, रुग्णालयाने त्याचे उत्तर न दिल्याने रुग्णालयाचा परवाना मनपाने ३१ ऑगस्टपर्यंत रद्द केला होता.

Last Updated : Sep 10, 2020, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details