ठाणे -जिल्ह्यातील शाळा 16 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात घरातूनच अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात मार्चमध्ये संपूर्णत: टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शाळेचे शैक्षणिक सत्र यंदा सुरू होऊ शकले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्ववत झाले. मात्र, पुन्हा दिवाळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही नियम लागू करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची साशंकता व्यक्त होत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. दरम्यान, इंग्लंडमधील कोरोनाच्या विषाणूच्या नवीन प्रादुर्भावामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच 16 जानेवारीपर्यंत तरी शाळा सुरू करता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.