महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Nale Safai: यंदा नालेसफाईवर आणि ठेकेदारांवर ड्रोनची नजर; नालेसफाईतील गोंधळाला लगाम लावण्यासाठी पालिका आयुक्तांनी काढली ब्लुप्रींट - watch on Thane nale safai

ठाण्यात कोट्यवधीची सफाई केल्यानंतरही पाणी साचल्याने नाले ओव्हर फ्लो होण्याचे दृश्य नजरेस पडतात. थोडक्यात नालेसफाईत सुरु असलेल्या गोंधळाला लगाम लावण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त यांनी यावर्षी नालेसफाईची ब्लुप्रींट काढून ठेवली आहे. ठेकेदारणावर आणि नालेसफाईच्या कामकाजावर आता ड्रोनची नजर राहणार आहे. यामुळे ठेकेदार किती मन लावून काम करतात, सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविली जातात काय? त्याचबरोबर किती क्युबिक कचरा काढला जातो? याचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत.

Thane Nale Safai
ठाणे नालेसफाई

By

Published : Apr 17, 2023, 10:17 AM IST

ठाणे :ठाणे पालिकेच्या नालेसफाईच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. नालेसफाईची कामे ही ३१ मार्चपर्यंत उरकण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आणि खुद्द आयुक्तांचा निर्धार आहे. यावर्षी नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण, छायाचित्र काढण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. नालेसफाईआधी आणि सफाईनंतरच्या कामांचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्यात नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारावर प्रत्येक ठिकाणानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेला आहे.


ठाण्यात एकूण नाले :ठाणे शहरात आणि पालिका हद्दीत एकूण ३२५ नाले आहेत. यात १३ नाले हे मोठ्या स्वरूपाचे असून मुख्य प्रवाहाचे नाले आहेत. ठाण्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून नालेसफाई चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. या भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. महापालिका घनकचरा विभागाने यंदा नालेसफाई सोबत पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख गटारांची देखील सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील १३ मोठ्या नालेसफाईचा तान कमी होणार आहे. ३१ मेपर्यंत उरकण्याचे लक्ष्य पालिकेने ठरविले आहे. त्याचबरोबर या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई बडगा उगारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने नऊ प्रभाग समिती स्तरावर नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत.


१० कोटीचा खर्च नालेसफाईसाठी निर्धारित :ठाणे पालिका हद्दीत असलेले १३ मोठे नाले, ३१२ छोटे नाले यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे. ३१ मेपर्यंत सर्वच नाले हे सफाई करून पूर्ण ठेवण्याचा निर्धार पालिका आयुक्तांचा आहे. तर या नाले सफाईवर आता ड्रोनची नजर राहणार आहे. त्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे. यंदा पालिकेने दरवर्षीप्रमाणे प्रभाग समिती स्तरावर नालेसफाईचा आराखडा तयार केलेला आहे. तर तब्बल १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्यक्षात या कामासाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. यामधील १ कोटी ५० लाख ९२ हजार रुपये वस्तु व सेवा कराचे तर ७ लाख ५५ हजार रुपये अन्य स्त्रोत्रातून खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात नालेसफाईसाठी ८ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.



नालेसफाईत दुर्लक्ष, दंड आकारणार :ज्या भागांमध्ये नालेसफाई योग्यप्रकारे झाली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जितके भागात नालेसफाई झालेली नाही, त्या प्रत्येक भागांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकरला जाणार आहे, असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण, छायाचित्र काढण्याबरोबर ड्रोनचाही वापर आता करण्यात येणार आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे पाणी तुंबल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर २५ हजार रूपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पालिका विश्वसनीय सूत्रांनी दिली. आता पालिका आयुक्तांच्या या निर्णयाने ठेकेदार आणि नालेसफाई अधिकारी यांना धडकी भरलेली आहे.

हेही वाचा : अबब....ठाण्यातील ५० टक्के नाल्याची झाली 'सफाई', नालेसफाईच्या दोऱ्यानंतर आयुक्तांच अजब दावा

ABOUT THE AUTHOR

...view details