ठाणे :Thane Accident News भिवंडी-वाडा महामार्गावरील पाळखणे गावच्या हद्दीत दोन तरुण दुचाकीने भिवंडीच्या दिशेने येत असताना, त्यांना रस्त्यात पडलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोघेही तरुण गंभीर झाले आहेत. आकाश जाधव (रा.दुगाड) व सूरज हिंगाडे (रा.भिनार) अशी अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक : अपघातात गंभीर जखमी झालेले दोघे मित्र रक्षाबंधनच्या दिवशी रात्री साडेबारा वाजता भिवंडी-वाडा महामार्गावरून घरी परतत असताना, त्यांची दुचाकी खड्यात आढळून अपघात झाला आहे. या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिक व गणेशपुरी पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्याही या दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले.
तात्पुरती खड्डयांवर मलमपट्टी :खळबळजनक बाब म्हणजे या अपघाताला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदार जिजाऊ संघटना असल्याचा आरोप, श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी व्हायरल व्हिडीओच्या माध्यामातून केला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, रस्त्यात पडलेल्या खड्डयांवर ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शनने माती, दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी केल्याने हे माती व दगड वर आले आहेत. त्यामुळे असे अनेक अपघात या महामार्गावर घडत आहेत.
लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करून कोटी रुपये उकळून थुकपट्टी लावली जात असून, याबाबत आमदार, खासदार सुद्धा मौन बाळगून गप्प आहेत- श्रमजीवीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार