ठाणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या विरोधात आक्षेपार्ह सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या संशयावरून सोमवारी रात्री उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी जीवघेणा हल्ला केला होता. यावरुन आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदेंची रुग्णालयात भेट घेतली. पत्रकारांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग याना भेटण्यासाठी गेले असता ठाणे पोलीस आयुक्त पळून गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे . तत्पूर्वी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये दाखल झाले. महिला कार्यकर्ते, पोलीस उच्च अधिकारी यांच्याशी आनंद मठात चर्चा करून निघून गेले. ठाण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री, मारहाण करणाऱ्या महिलागुंड, मुख्यमंत्री शिंदेंवर आगपाखड केली.
१५ महिलांनी केली मारहाण : रोशनी दीपक शिंदे रा. टिटवाळा, या ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटा मोटर्स येथे कामाला आहेत. सोमवारी रात्री ८-३० वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली. याच प्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे ठाण्यात आले होते. आणि मुख्यमंत्री यांनी देखील आनंद मठात याच प्रकरणाबाबत महिला कार्यकर्ते आणि उच्च पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली. रोशनी शिंदे यांना चराई रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा खरपूस समाचार घेतला.