नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी 10 नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील 5, खारघरमधील 3 तसेच नवीन पनवेलमधील 1 आणि खांदा कॉलनी परिसरातील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात 199 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यातील 88 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
या क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कामोठ्यामधील रुग्ण संख्या पाहता संपूर्ण कामोठे शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बुधवारीही कामोठेमध्ये पाच रुग्ण आढळले आहेत. कामोठे, सेक्टर-17 मधील 33 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचे पती गोवंडी येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
सोबतच कामोठे, सेक्टर-8 मधील 43 वर्षीय व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. संबधित व्यक्ती पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामोठे सेक्टर- 6 मधील अनंत वाटीका सोसायटीतील 35 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत नायगाव येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले आहे.