ठाणे :जोरदार होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका स्थित मानवली-इर्शाळवाडी गावावर अचानक दरड कोसळली. रात्री शांत झोपेत असताना गावातील घरांवर दरड कोसळली व अनेक दुर्दैवी जीव त्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत अनेकांना बाहेर काढण्यात आले असले तरी, अजून मोठ्या प्रमाणात नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याने TDRF चे जवान यांच्या प्रयत्नांची पराकष्ठा सुरू आहे.
माळीण दुर्घटनेची आठवण : पावसाळा सुरु झाला की, डोंगर दऱ्यात वसलेल्या गावांना माळीण दुर्घटनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. डोंगरावरची दरड कोसळल्याने पायथ्याशी असलेले संपूर्ण गावच देशाच्या नकाशावरून पुसले गेले. अजूनही माळीण गावातील गावकरी आपल्यावर ओढवलेल्या संकटाच्या आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तशीच काहीशी घटना बुधवारी रायगड जिल्ह्यातील मानोली-इर्शाळवाडी गावात घडली. जेव्हा रात्री पावणे बाराच्या सुमारास शांत झोपी गेलेल्या आणि कुटुंबांवर नियतीने घाला घातला. अनेक घरे कोसळलेल्या दरडीखाली सापडली व 70 ते 80 लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना : घटनेचे गांभीर्य ओळखून एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. त्याचबरोबर सर्व आपत्तीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पिवळे कपडे आणि लाल हेल्मेटमध्ये हे जवान मैलोन्मैल चिखल तुडवत घटनास्थळी पोचले. त्यांनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. वरून कोसळणारा पाऊस आणि पायाखाली असलेली दलदल याची तमा न बाळगता, टीडीआरएफची टीम अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.