ठाणे:मुंब्रा डोंगरावर असलेल्या अनधिकृत बांधकामांची वनविभागाकडून अलीकडेच पाहणी करण्यात आली. मात्र, मशिद व दर्ग्याचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यावर मनसे ठाम आहे. डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज (सोमवारी) ठाणे उपवनसंरक्षकांची भेट घेतली. प्रशासनाने कारवाई न केल्यास तेथे गणेश मंदिर उभारण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाला या संदर्भात सर्वेक्षण करावे लागले आहे.
अनधिकृत दर्ग्यांवर मनसेची वक्रदृष्टी:शिवाजी पार्क येथील मैदानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगली आणि मुंबईतील समुद्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजारीचे वास्तव समोर आणले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत दोन्ही मजार जमीनदोस्त केल्या. यानंतर राज्यभर मनसैनिकांनी आपापल्या विभागातील अनधिकृत दर्गे, मशिदीविरोधात आवाज उठवला होता. ठाणे शहर मनसेनेही दोन दिवसांपूर्वी मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्यांचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ही जागा वनविभागाची असल्याने मनसेच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने तातडीने मुंब्रा डोंगरावरील बांधकामांची पाहणी केली होती. मात्र, कारवाईचा बडगा न उगारल्याने सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसैनिकांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट घेतली.