शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटलांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही - सुरेश म्हात्रे
युतीला माझा कधीच विरोध नव्हता, आजही नाही. मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता, शिवसैनिकांची आर्थिक आणि राजकीय कोंडी केली होती, अशा कपिल पाटलांचे मी कधीच समर्थन करणार नाही, असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.
ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून युतीच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. यानंतर, शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटील यांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी युतीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच शिवसेना पक्षश्रेष्ठींनी तडकाफडकी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावरून निलंबनाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून म्हात्रे यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला होता. अखेर पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.