महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड सेंटरमध्ये पोक्सोत अटक केलेल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या - भिवंडीत आरोपीची आत्महत्या न्यूज

आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरीता भिवंडी तालुक्यातील भिनार आश्रमशाळेत उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोपीने नैराश्यातून छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्यानू रामशरण हलवाई (वय २४ रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या करणाऱ्या कोविड रुग्ण आरोपीचे नाव आहे.

भिवंडी तालुका पोलीस स्टेशन
खळबळजनक ! कोविड सेंटरमध्ये पोक्सोत अटक केलेल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : May 29, 2021, 4:02 PM IST

ठाणे - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला पोक्सो कायद्यांंतर्गत अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरीता भिवंडी तालुक्यातील भिनार आश्रमशाळेत उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोपीने नैराश्यातून छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. तर या घटनेमुळे कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. ग्यानू रामशरण हलवाई (वय २४ रा. उत्तरप्रदेश) असे आत्महत्या करणाऱ्या कोविड रुग्ण आरोपीचे नाव आहे.

राजस्थानमधून केली होती अटक
मृत आरोपी ग्यानू रामशरण हलवाई याच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल होताच तेव्हापासून तो फरार होता. मात्र पडघा पोलिसांनी त्याला राजस्थान येथून ताब्यात घेत २० मे रोजी अटक केली होती. त्यांनतर भिवंडी न्यायालयात हजर केले असता २४ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली होती. त्या दरम्यान त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर भिनार येथील कोविड सेंटर मध्ये स्वतंत्र खोलीत त्यावर उपचार सुरू होते.

भोजन व नाष्टा पुरवठा करणाऱ्या ठेकरदारामुळे प्रकार उघड
पोलीस कोठडी संपल्यानंतर २५ मे रोजी न्यायालयात झालेल्या ऑनलाइन सुनावणीत मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. मात्र त्यांनतर बुधवारी २६ मे रोजी सकाळी कोविड सेंटर मधील भोजन व नाष्टा पुरवठा करणारा ठेकरदार सकाळी ८ . २० वाजता आरोपी असलेल्या खोलीत गेला असता त्यास ग्यानू रामशरण हलवाई हा छताच्या पंख्यास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने कोविड सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

वैफल्यग्रस्त होत नैराश्य आल्याने आत्महत्या
कोविड केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी या घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना कळविली असता पोलीस प्रशासनासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णायात रवाना केला. मात्र पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली असतानाच कोरोनाची लागण झाल्याने वैफल्यग्रस्त होत नैराश्य आल्याने आरोपी ग्यानू हलवाई याने आत्महत्या केल्याचा कयास काढला जात असून अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details