ठाणे - सध्या संपूर्ण राज्य विठ्ठलमय झाले असून मोठ्यांपासून ते बाल-गोपालांपर्यंत सर्वच नज विठू नामाच्या गजरात दंग आहेत. आषाढी एकादशीच्या निमीत्ताने शुक्रवारी पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बाल वारकऱ्यांनी दिंडी काढली. पारंपरिक वेशभूषा करून विठू नामाचा गजर करत गोल रिंगण घातले.
ठाण्यात बाल वारकऱ्यांची दिंडी, पारंपरिक वेषेत केले रिंगण - विठू नामाचा गजर
आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाची भक्ती करण्यासाठी ठाणे पूर्वेकडील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून, गोल रिंगण घालत विठू नामाचा गजर केला.
विठ्ठल म्हणजे भक्तीचा अथांग सागर असून टाळ, मृदंग, वीणा, गंध, बुक्का म्हणजे विठ्ठल वारीतील वारकऱ्यांची भक्ती व नामसंकीर्तनाचा उत्सव आहे. आषाढी एकादशीला अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या लाडक्या विठुरायाची भक्ती करण्यासाठी ठाणे पूर्वेकडील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बाल वारकऱ्यांनी दिंडी काढून विठू नामाचा गजर केला.
यावेळी पारंपरिक वेशभूषा करून बाल वारकऱ्यांनी साकारलेले गोल रिंगण विलोभनीय ठरले. शाळेच्या परिसरातून अष्टविनायक चौकापर्यंत दिंडी काढून टाळ मृदूंगाच्या गजरात विठू नामाचा गजर केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकदेखील सहभागी झाले होते.