ठाणे - शाळेतील मैदानाच्या जागेवर अतिरिक्त बांधकामामुळे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. वागले परिसरातील हाजूरी भागात महापालिकेची शाळा क्रमांक १२६ आणि ३२ आहे. या उर्दू शाळेच्या जागेवर मैदानावर डेटा सेंटरच्या अतिरिक्त बांधकामामुळे बाधित झालेले मैदान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण करण्यात आले.
या वेळी करण्यात आलेल्या उपोषणात विद्यार्थ्यांसोबत पालकही सहभागी झाले होते. तसेच या विद्यार्थांनी रस्त्यावरच मैदानी खेळ खेळून मनपाच्या निर्णयाचा निषेध केला. तसेच आपल्याला लवकरात लवकर खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे आणि नवीन बांधकाम हटवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सदर प्रकरणात गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकडे पाठपुरावा केला. मात्र, तरीदेखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.