ठाणे- हाजुरी येथील महापालिकेच्या शाळेतील (शाळा क्र.१२६,३२) मैदानाच्या जागेवर डाटा सेंटर उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मैदान नाहीसे होणार असल्याने सदर कामाच्या विरोधात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शाळेच्या मैदानात सुरू असलेले काम बंद करा, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिली.
हाजुरी येथे ठाणे महापालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग भरले जातात. शाळेच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीने डाटा सेंटरची इमारत बांधण्यात येत आहे. त्यामुळे शाळेचे मैदान पूर्णपणे बाधित होणार असल्याचे आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेच्या मैदानावर स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, शारीरिक शिक्षण व कवायती यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, भविष्यात मैदानच शिल्लक राहणार नसल्याने अभ्यासेतर उपक्रम करता येणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.