ठाणे : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर, दोघा विद्यार्थ्यांनी मैत्रणीच्या वादातून हल्ला करीत, त्याचा दात तोडून डोळ्याला गंभीर इजा केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयाच्या समोरच घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरदीन पटेल, आणि मोहित असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर क्रिश दिनेश मिश्रा (वय १८, रा. गांधीनगर डोंबिवली पूर्व) असे गंभीर जखमी विद्यार्थांचे नाव आहे.
मैत्रीणीवरुन झाला वाद : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जखमी क्रिश हा डोंबिवली पूर्व भागातील गांधीनगर परिसरातील एका इमारतीमध्ये कुटूंबासह रहातो. तो डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर हल्लेखोर दोन्ही विद्यार्थी देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत असून; गेल्या काही दिवसापासून जखमी क्रिशने महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीशी मैत्री केली. यामुळे हल्लेखोर फरदीन आणि मोहित यांनी क्रिश सोबत वादही घातला होता. मात्र तरी देखील क्रिश त्या तरुणीशी मैत्रीत गप्पा करीत असल्याचे हल्लेखोरांना दिसून आले. त्यातच १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हल्लेखोर विद्यार्थ्यांनी त्याला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश दारावर गाठले.