मीरा भाईंदर (ठाणे)- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देशभरात लाॅकडाऊन लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे बंद झाल्याने कामगार आपल्या गावी परत गेले आहेत. आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, काम करण्यासाठी कामगारच नाहीत. त्यामुळे उद्योजक अडचणीत सापडले आहेत.
आशिया खंडातील सर्वांत मोठी स्टील भांड्यांची वसाहत मीरा भाईंदरमध्ये आहे. भाईंदर पूर्व परिसरात रेल्वे फाटकाजवळ पांचाळ औद्योगिक वसाहत, कस्तुरी उद्योग, विकास इंडस्ट्रीज, स्वस्तिक औद्योगिक वसाहत, एम.आय. उद्योग, जय अंबे इंडस्ट्रीज अशा मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याठीकाणी चमचा, कप, वाटी, ताट, मिक्सरसाठी लागणारी भांड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. यात साधारण 50 हजार कामगारांना रोजगार मिळतो.