महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State Govt Neglecting TDRF Jawans : TDRF जवानांचा वाली कोण? तुटपुंज्या मानधनावर कुठवर जीवाची बाजी लावायची?

आपत्ती नैसर्गिक असो अथवा मानवी, ठाण्याच्या TDRF अर्थात ठाणे आपत्ती प्रतिसाद दल याच्या मदतीशिवाय पर्याय नसतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत TDRF चे जवान आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवण्याचे काम करतात; परंतु या जवानांना आता त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनात जीव धोक्यात घालणाऱ्या या जवानांची व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळवून देणार का? असा सवाल हे जवान विचारत आहेत.

By

Published : Aug 7, 2023, 7:40 PM IST

State Govt Neglecting TDRF Jawans
TDRF जवानांचा वाली कोण

TDRF जवानांच्या व्यथेविषयी बोलताना संघटनेचे ज्येष्ठ नेते

ठाणे :दरड कोसळणे, क्रेन तुटणे, पूर येणे किंवा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत TDRF चे नाव प्रकर्षाने पुढे येत असते. 2017 साली आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी TDRF ची स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत गेली सहा वर्षे सर्वच प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे जवान आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. TDRF दलात सध्या एकूण 33 जवान असून आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. महत्त्वाचे म्हणजे शिफ्ट ही जरी आठ तासांची असली तरीही त्यांना उरलेले 16 तास 'स्टॅन्ड बाय'वर राहावे लागते. म्हणजेच 24 तासात केव्हाही कोणतीही परिस्थिती उद्‌भवली तर या जवानांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी हजर व्हावे लागते. एवढे करूनसुद्धा त्यांच्या वाट्याला येते ती फक्त निराशाच.

तुटपुंज्या वेतनामुळे जवान त्रस्त :TDRF जवानांच्या निराशेचे पहिले कारण म्हणजे, त्यांचा अत्यंत तुटपुंजा पगार होय. एकीकडे या दलाची स्थापना झाल्यापासून त्यांना केवळ 20 हजाराच्या मानधनावर अविरत सेवा द्यावी लागत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या प्रमाणेच कर्तव्य बजावणाऱ्या 'एनडीआरएफ' अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना जवळपास पाचपट पगार मिळतो. TDRF चे पथक संपूर्ण राज्यात आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना सतत काळजी भेडसावत असते ती त्यांच्या कुटुंबीयांची. एवढ्या मानधनात कसे भागवावे आणि आपल्या मुला-बाळांचे उज्ज्वल भविष्य कसे बनवावे, असा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो. मागीलवर्षी महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलात 79 पदांना राज्य शासनाने मान्यता दिली होती; परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने केवळ 33 जवानच आपले प्राण पणाला लावून राज्यातील नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करत आहेत.

TDRF जवानांच्या श्रमाकडे दुर्लक्षच :मागीलवर्षी तळीयेमध्ये झालेली दुर्घटना असो किंवा आताची इर्शाळवाडी येथील कोसळलेली दरड असो, दोन्ही ठिकाणी TDRF च्या जवानांनी प्राण पणाला लावून अनेकांचे प्राण वाचवले. भिवंडी दुर्घटना, समृद्धी महामार्ग दुर्घटना किंवा भिवंडी इमारत दुर्घटना असो प्रत्येक ठिकाणी TDRFच्या जवानांनी वेळेत पोहोचून बचावकार्य सुरू केले. भिवंडी इमारत दुर्घटनेच्यावेळी तर या टीमने तब्बल 25 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढून त्यांना जीवनदान दिले. प्रत्येक दुर्घटनेनंतर या टीमचे सर्वत्र कौतुक होते आणि एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेकदा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे; परंतु एवढे असून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. केवळ 20 हजाराचे मानधन आणि डोक्यावर सतत लटकणारी मृत्यूची तलवार यामुळे अनेकांनी राजीनामे देखील दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ठाणे महानगरपालिकेतील सर्वांत कनिष्ठ कर्मचाऱ्याला देखील TDRF जवानांच्या दुप्पट किंवा जास्तच पगार मिळतो ही वस्तुस्थिती आहे.


पावसाळ्यात सर्वाधिक काम :सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, TDRF जवानांकडे सध्या स्वतःची रबरबोट नसल्याने त्यांना अग्निशमन दल किंवा इतर दलांकडून रबरबोट घेऊन आपले कर्तव्य बजावावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. या जवानांना आश्वासने तर खूप मिळाली; परंतु त्यांची पूर्तता झाली नसल्याने या जवानांकडून नाराजीचा सूर ऐकायला मिळतो. TDRF जवानांना सेवेत कायम करून 'एनडीआरएफ' एवढाच पगार द्यावा, अशी मागणी ठाण्यातील ज्येष्ठ नेते संजय घाडीगावकर यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात
  2. Raigad Landslide News : इर्शाळवडीच्या मोहिमेवरुन टीडीआरएफची टीम ठाण्यात परतली; 22 जवानांचे शोध मोहिमेत मोलाचे मदत कार्य
  3. TDRF Team Ready : पावसाळ्यातील अवघड कामगिरीसाठी टीडीआरएफ टीम सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details