ठाणे : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शंभर रुपयांमध्ये दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न ( Trying to sweeten Diwali ) राज्य सरकारने केल्याचे दाखवत, दिवाळीच्या तोंडावर निर्णय घेऊन सरकार सर्वसामान्य नागरिकांचा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात ही फक्त दिशाभूल असल्याचे पाहायला मिळाले आहे. नागरिकांमधील सरकार विरोधातला रोज कमी करण्यासाठी ही एक घोषणा होती. याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या सर्वच रेशनिंगच्या दुकानावरती पाहायला मिळत आहे.
100 रुपयात दिवाळीचे साहित्य असलेले पेकेट :महाराष्ट्रातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लाभार्थीना खुश करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीसाठी मोठे आश्वासन देत 100 रुपयात आवश्यक ते दिवाळीचे साहित्य असलेले पेकेट देण्याचे आदेश काढले. मात्र प्रत्यक्षात या बाबतीत सरकारकडून कोणताही नियोजन न झाल्याने आता दिवाळीपूर्वी हे साहित्य मिळाले कठीण झालेले दिसत आहे. या सर्व बाबीचा आढावा घेतला असता सरकारची ही घोषणा केवळ वेळ मारण्याची आणि नागरिकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी होती का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आला आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत दिले जाणार होते. मात्र प्रत्यक्षात आजही हे साहित्य रेशनिंगच्या दुकानात पोहचले नसल्याचे पाहायला मिळाले आहे.