ठाणे -कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच राज्य सरकारने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले असल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केला. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांच्यानंतर ठाणे महापालिकेतील दोघा अतिरिक्त आयुक्त्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कोविड-१९वर नियंत्रण मिळेल काय? असा सवालही आमदार डावखरे यांनी राज्य सरकारला केला.
राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी अधिकाऱ्यांचे बदली सत्र - निरंजन डावखरे
कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच राज्य सरकारने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले असल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
केरळ पॅटर्नच्या माहितीसाठीही महिनाभराची दिरंगाई
देशात कोविडचा प्रसार रोखण्यास केरळ राज्याने लागू केलेला पॅटर्न यशस्वी झाला. या पॅटर्नची देशभरात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून चर्चा सुरू झाली. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला जाग आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केरळ पॅटर्नची माहिती घेण्यास सुरुवात झाली. आपल्या देशातील एका राज्यातील माहिती घेण्यासही महिनाभराची दिरंगाई झाली, अंमलबजावणी तर अजून दूरच आहे. अशा या सरकारला कार्यक्षम म्हणावे का? असा सवाल आमदार डावखरे यांनी केला.
क्वारंटाईन केंद्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी
भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरिट सोमैया यांनी केलेल्या पाहणीत क्वारंटाईन केंद्रातील भ्रष्टाचार उघड केला आहे. मुंबई-ठाण्यातील केंद्रात १७२ रुपयांपासून ४१५ रुपयांपर्यंत दरडोई दर आकारण्यात येत आहेत. सर्वाधिक दर ठाणे शहरातील आहेत. प्रत्यक्षात संबंधित केंद्रात सुविधांची वानवा आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न, पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आदी स्थिती आहे. त्यामुळे क्वारंटाईन केंद्राच्या माध्यमातून भ्रष्टाचारासाठी नवे `ग्राऊंड' मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.