महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Silahar Shiv Mandir : एक हजार वर्षांपूर्वीचे शिवमंदिर लवकरच चमकणार! परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर - खासदार डॉ श्रीकांत शिंदे

देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने 138.21 कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नुकत्याच साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला असून, लवकरच शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाला सुरूवात होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 23, 2023, 7:44 PM IST

ठाणे : अंबरनाथ शहरात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. केवळ अंबरनाथच नव्हे तर राज्याचे भूषण असणारे हे शिवमंदिर शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार आहे. या प्राचीन वास्तुच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अंबरनाथ शहराची ओळख प्रभावीपणे स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून मंदिरालगतच्या परिसराचा विकास करण्याची संकल्पना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. एकीकडे राज्य शासन आणि दुसरीकडे पुरातत्व विभाग यांच्याकडे या संकल्पनेचा पाठपुरावा करत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय किर्तीचा भव्य शिवमंदिर आर्ट फेस्टीव्हल मंदिर परिसरात भरवण्यास सुरूवात केली.

अंबरनाथ शिलाहारकालीन शिवमंदिर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने काम : जागतिक किर्तीच्या अनेक संगीत, शिल्प आणि चित्रकारांनी या फेस्टीव्हलच्या माध्यमातून प्राचीन शिवमंदिराला भेट देत आपली कला सादर केली होती. या कलाविष्काराच्या माध्यमातून शिवमंदिरांची देशभरात नव्याने ओळख झाली. त्याचबरोबर प्राचीन वास्तुकलेच्या या ठेव्याची महती जगभरातील शिवभक्तांना कळावीयासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता.

अंबरनाथ शिलाहारकालीन शिवमंदिराचा परिसर

बांधकाम स्वरुपातील कामांना पुरातत्व विभागाची मंजुरी : अंबरनाथ येथील शिवमंदिर हे केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असल्याने या प्रकल्पातील कामे हाती घेण्यासाठी पुरातत्व विभागाची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या प्रस्तावाचे मंदिराच्या भुखंडाच्या सीमेपासून शंभर मीटर अंतरामधील दुरुस्ती आणि नुतनीकरणाची कामे तसेच शंभर मीटर अंतरा बाहेरील बांधकामस्वरुपाची कामे अशा दोन भागामध्ये विभाजन करुन मंजुरीचा प्रस्ताव पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामांसह बांधकाम स्वरुपातील कामांना पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे.

अंबरनाथ शिलाहारकालीन शिवमंदिराचा परिसर

शिवमंदिराच्या परिसराचे रूप पालटण्याचा मार्ग मोकळा : राष्ट्रीय स्मारक पुरातत्व विभागाच्या अटी आणि शर्तीचे पालन करुन हा परिसर भाविकांसाठी एक चांगले पर्यटन क्षेत्र बनवण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 138.21 कोटी किंमतीच्या प्रकल्पाला परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी तातडीने मंजुरी देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यामुळे शिवमंदिराच्या परिसराचे रूप पालटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंबरनाथ शिलाहारकालीन शिवमंदिरात खा. श्रीकांत शिंदे

असे होणार सुशोभीकरण :विकास कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय स्मारक प्राधिकरणात 14 फेब्रुवारी, 2023 रोजी झालेल्या बैठकीत शिवमंदिरापासून शंभर मिटर अंतराबाहेर करण्यात येणाऱ्या खालील कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान, दरवर्षी डॉ .श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा १६ ते १९ मार्च दरम्यान रंगणार आहे. यंदाही अनेक प्रसिध्द कलाकारांची उपस्थित या कार्यक्रमाला असेल. दोन वर्षांनंतर होणाऱ्या या फेस्टिवलमधून अनोख्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे.

धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार : स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर सध्याच्या काळात सुस्थितीत असलेली त्याकाळातील एकमेव वास्तू आहे. या स्थापत्य कलेचे संवर्धन करून तिची कीर्ती जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. शिवमंदिर परिसर सुशोभिकरण प्रकल्पामुळे अंबरनाथ शहर हे देशातील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे. या शहराला टेम्पल सिटी म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने हाएक महत्वाचा टप्पा आहे. असे मत खासदार, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :Shiv Sena Crisis : ठाकरेंनी राजीनामा दिल्याने अधिकार गमावले, सुप्रिम कोर्टाची टिप्पणी

ABOUT THE AUTHOR

...view details