कल्याण( ठाणे)- शासकीय कार्यालयासह मंत्रालयात 10 टक्के अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती आजपासून अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख आगार असलेल्या कल्याण डेपो मधून 512 एसटी बसेसच्या फेऱ्यांसह मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी 68 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. तसेच, मुंबई बेस्टच्या विशेष बस म्हणून कल्याण रेल्वे स्थानकासमोरून विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी 150 बेस्टच्या विशेष बसेसच्या फेऱ्या ही आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
कल्याण एसटी डेपो मधून 512 बसेससह 150 बेस्टच्याही विशेष फेऱ्या सुरू - कोरोना
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत कल्याण एसटी डेपो मधून सुमारे 512 एसटी बसेस विविध ठिकाणी चालवण्यात येत असल्याची माहिती कल्याण डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नवीन सर्वसमावेशक अधिसूचना आजपासून जारी केली आहे. मात्र, त्याआधीच जिल्हा प्रशासनाने पूर्ण ठाणे जिल्हा रेड झोन असल्याचे सांगत बहुतांश शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. त्यातच राज्य सरकारकडून 20 एप्रिल नंतर राज्यातील काही भागात पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. याचेच काटेकोरपणे पालन करत कल्याण एसटी डेपो मधून सुमारे 512 एसटी बसेस विविध ठिकाणी चालवण्यात येत असल्याची माहिती कल्याण डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली आहे. तसेच सकाळपासूनच अत्यावश्यक सेवेसह विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही एसटी बस सेवेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळा मार्फत कल्याण बस डेपो मधून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी 68 एसटी बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई महापालिका आणि इतर अत्यावश्यक सेवेच्या विभागात काम करणाऱ्या 30 टक्के कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आल्याने कल्याण रेल्वे स्थानका समोरून लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणासाठीही 150 बेस्ट बसेस चालवण्यात येत आहेत.