ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 40 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा 17 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर यापूर्वीच हजारो कामगारांचे जथ्थे मुंबई - नाशिक महामार्गाने गावी जाण्यासाठी पायपीट करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे परप्रांतीय कामगारांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील कामगारांना घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वे भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून येथून आज (शनिवार) सायंकाळी रवाना होणार आहे.
भिवंडीहून गोरखपूरला जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी विशेष रेल्वेची सोय हेही वाचा...कोरोनामुळे ६० वर्षांनंतर महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात पडली लक्ष्मण रेषा
भिवंडी शहरातील सर्व पोलीस ठाण्याकडून याबाबत कामगारांना माहिती देण्यासाठी घोषणा करण्यात येत आहे. जे गोरखपूर जिल्ह्यातील आहेत त्यांनीच आधारकार्डचा पुरावा आणि 800 रुपये प्रवास भाड्याचे पैसे घेऊन सहा पोलीस ठाण्यातील नेमून दिलेल्या जागेवर दुपारी 3 वाजता एकत्र होण्याचे आवाहन करण्यात आले. हे कामगार नियोजित ठिकाणी जमा झाल्यानंतर या ठिकाणावरून बसद्वारा भिवंडी रेल्वे स्थानकात कामगारांना घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, ही माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरल्यानंतर शहरातील विविध पोलीस ठाण्याबाहेर कामगारांनी एकाच गर्दी केली होती. विशेष म्हणजे भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील परप्रांतीय कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी रेल्वे स्थानकात व परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.