ठाणे- भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. ही ट्रेन मध्यरात्री 12 वाजून 58 मिनिटांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून 1 हजार 104 कामगारांना घेऊन गोरखपूरकडे रवाना झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा तिसऱ्यांदा करण्यात आली. यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
भिवंडी ते गोरखपूर विशेष श्रमिक ट्रेन 1104 कामगारांना घेऊन मध्यरात्री रवाना चौदा दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांना शनिवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष ट्रेन गोरखपूरसाठी सोडणार असल्याचे सांगण्यात आले होते. डीसीपी शिंदे यांनी भिवंडी पोलीस परिमंडळ मधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गोरखपूरच्या कामगारांचे विविध कागदपत्रे तपासून त्यांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्याचे निर्देश त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले होते.
पोलिसांनी कामगारांना आधारकार्डचा पुरावा व 800 रुपये प्रवास भाड्याचे पैसे घेऊन सहा पोलीस ठाण्यातील नेमून दिलेल्या जागेवर दुपारी 3 वाजता एकत्र होण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूर मानसरोवर, निजामपुरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूर एसटी स्टँड , तर शांतीनगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मजुरांना भादवड येथील संपदा नाईक हॉल तर नारपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मजुरांना अंजुरफाटा येथील हरी धारा इमारत येथे तसेच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मजुरांना कोनगाव पंचक्रोशी मैदान कोनगाव येथे बसण्याची व्यवस्था करण्यात येऊन याच ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली होती. विशेष म्हणजे मजुरांनी सर्वच ठिकाणी गर्दी केल्याने विशेष श्रमिक ट्रेनचे बुकिंगकाही वेळातच बुकिंग फुल झाले होते. ही ट्रेन शनिवारी भिवंडी रेल्वे स्थानकातून सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुटणार होती, मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी, व ओळखपत्र वैगैरे कागदपत्रे तपासणीस उशीर होणार असल्याने ही ट्रेन मध्यरात्री 12 वाजून 58 मिनिटाने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित हिरवा झेंडा दाखवून सोडण्यात आली.
दरम्यान , भिवंडीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पोलीस ठाण्या निहाय पुढीलप्रमाणे भोईवाडा पोलीस ठाणे 211, भिवंडी शहर पोलीस ठाणे 395, शांतीनगर पोलीस ठाणे 67, नारपोली पोलीस ठाणे 422, कोनगाव पोलीस ठाणे 105 अश्या एकूण एक हजार 200 कामगार प्रवाश्यांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, 96 कामगार प्रवासी काही कारणामुळे यातून वगळण्यात आले. त्यामुळे ही विशेष श्रमिक ट्रेन 1 हजार 104 कामगारांना घेऊन गोरखपूरकडे रवाना झाली आहे. रेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.