ठाणे- कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातील यंत्रमाग उद्योग कोरोना संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद होता. आता दोन महिन्यानंतर 'मँचेस्टर सिटी'मध्ये हजारो पॉवर लूम कारखान्यांमध्ये धडधड सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे यंत्रमाग कामगारांसह मालकांना कोरोनाच्या सावटातच दिलासा मिळाला आहे.
'मँचेस्टर सिटी'ची धडधड दोन महिन्यानंतर सुरू; यंत्रमाग कामगारांसह मालकांना दिलासा गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून मंदीच्या विळख्यात सापडली आहे. २० हजार कोटींचे वार्षिक टर्न ओव्हर आणि प्रतिदिन ३ कोटी मीटर सुती कापडाचे उत्पादन भिवंडी शहरात होते. मात्र, यंत्रमाग व्यवसायाला कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शहरातील सुमारे ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाली होती. त्यातच जीवघेण्या कोरोना विषाणूने डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात थैमान घालून हजारो नागरिकांचे बळी घेतल्याचे जगासमोर आले. त्यानंतर जागतिक पातळीवर या कोरोनाने थैमान घातल्याने अनेक देशांनी चीन या देशाशी आयात निर्यात बंद केली. त्यामुळे चीनचा वस्त्रोद्योग व्यवसायासोबतच अन्य व्यवसायातील दबदबा कमी झाला. ही संधी भारताच्या पथ्यावर पडणारी होती.
भारतात देशांतर्गत व अरब राष्ट्रांमध्ये सुती कापडाची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून मंदीच्या विळख्यात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला सुगीचे दिवस येणार, असे कापड व्यावसायिकांना वाटत होते. मात्र त्याच दरम्यान कोरोनाने भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र व राज्य सरकारांनी जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ जमावबंदी, संचारबंदी व त्यापाठोपाठ राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सीमा सीलबंद (लॉक डाऊन ) करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे भिवंडी शहर परिसरातील ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाली होती.
देशभरातील सुती कापड निर्यात भिवंडी शहरातून ७ टक्के केली जाते. ती आता ३ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. आशिया खंडासह फ्रान्स, इटली, अमेरिका, रशिया आदी देशांमध्ये देखील भिवंडीतील सुती कापड निर्यात केले जात होते. तर लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कारखाने बंद ठेवावे लागल्याने या व्यवसायाशी निगडीत असलेले साखळी पद्धतीने चालणारे छोटे व्यावसायिक जसे बीम चालक, वारपीन, ट्विस्टिंग, डबलिंग, वाईडींग, फोल्डिंग, साईजिंग, प्रोसेस हाऊस, ट्रान्सपोर्ट आदी हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार एका झटक्यात हातचा निघून गेल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे चार लाख कामागरांपैकी २ लाख कामगारांनी लॉकडाउनच्या काळात आपले घर गाठले आहे. तर २ लाख कामगार आजही भिवंडीत अडकून पडले आहेत. मात्र, गेल्या २ महिन्यापासून संपूर्ण यंत्रमाग कारखाने बंद असल्याने शहराची अर्थ व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. दरम्यान, यंत्रमाग बंद असल्याने येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातच यंत्रमाग कारखाने बंद झाल्याने यंत्रमाग मालकांवर देखील आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने यंत्रमाग उद्योग सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने यंत्रमाग मालकांकडून होत होती. आर्थिक संकटात सापडलेला यंत्रमाग मालक व मेटाकुटीला आलेला यंत्रमाग कामगार यामुळे राज्य शासनाने यंत्रमाग उद्योग सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यशासनाच्या या निर्देशांनुसार भिवंडीतील यंत्रमाग मालकांनी आपले यंत्रमाग कारखाने सुरु करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिले आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील यंत्रमाग कारखाने बंदच राहणार असून जोपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात येणार नाही. तोपर्यंत या प्रतिबंधित क्षेत्रातील यंत्रमाग कारखाने बंदच राहणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना देखील यंत्रमाग कारखान्यात कामावर घेऊ नये. त्याचबरोबर प्रतिबंधितक्षेत्र वगळता जे यंत्रमाग कारखाने सुरु होतील, त्या कारखान्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापर व कामगारांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. जर एखाद्या कामगाराला ताप अथवा कोरोना संभाव्य लक्षणे आढळल्यास त्याची माहिती तत्काळ मनपा प्रशासनास देणे बंधनकारक असेल, अशी सूचना देखील मनपा आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी दिल्या आहेत.
आज कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखाने गेली २ महिने बंद आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय मंदीच्या विषाणूने संक्रमित झालेला आहे. यापूर्वी भिवंडीत ८ लाखांच्या पेक्षा अधिक यंत्रमाग होते. मात्र काही कारखाना मालकांनी कारखाने बंद करून यंत्रमाग सामुग्री २८ रुपये किलोच्या भावाने भंगारात विकून यंत्रमाग व्यवसाय बंद केल्याची माहिती भिवंडी पॉवरलूम विव्हर्स फेडरेशनचे अध्यक्ष युसूफ हसन मोमीन यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.